मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात शिंदे सरकारचा तब्बल ३९ दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप सुद्धा रखडला होता. त्यामुळे खातेवाटप कधी होणार अशी चर्चा राज्यभर रंगू लागली आहे. आता अखेरीस खातेवाटपाची यादी फायनल झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे यादी पाठवण्यात आली असून लवकरच खातेवाटप जाहीर होणार आहे.
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार तर झाला पण खातेवाटप होत नसल्यामुळे मंत्री आपल्या दालनात जाण्यापासून ताटकळत उभे राहिले होते. अखेरीस राज्य सरकारच्या नव्या कॅबिनेट मंत्र्यांचे खातेवाटप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या स्वाक्षरीनंतर राज्य सरकारच्या खातेवाटप लवकरच जाहीर होणार आहे. विशेष म्हणजे, उद्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे, अजूनही पालकमंत्री कोण असणार याची यादी जाहीर झाली नाही. फक्त सर्व 18 मंत्र्यांना जिल्हे वाटून देण्यात आले आहे.
दरम्यान, मंत्र्यांनी दोन-तीन खाती आणि बंगल्याचे ऑप्शन मागितल्यानंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र बसून याबाबतचा निर्णय घेणार आहेत. खातेवाटप आणि बंगले वाटप करताना मंत्र्यांची नाराजी होऊ नये यासाठी शिंदे आणि फडणवीस प्रयत्न करणार आहेत. राज्याचं पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाआधी सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करावा लागेल, अन्यथा विरोधकांकडून सरकारला धारेवर धरलं जाईल.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह आता राज्यात 20 मंत्री आहेत. मंगळवारी भाजपच्या 9 आणि एकनाथ शिंदेंच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, विजयकुमार गावित, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा आणि सुरेश खाडे यांनी शपथ घेतली, तर शिंदेंकडून संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत, संजय राठोड, दीपक केसरकर, दादा भुसे आणि तानाजी सावंत यांची मंत्रिपदावर वर्णी लागली.