धरणगाव : प्रतिनिधी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ७५ फुटांच्या तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. परंतू या कार्यक्रमाला राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी डावलल्याचा आरोप धरणगाव पालिका प्रशासनावर केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ७५ फुटांच्या तिरंगा ध्वज स्तंभाचे पूजन आणि ध्वजारोहण मुख्याधिकारी तथा प्रशासक जनार्दन पवार यांच्याहस्ते आज सकाळी करण्यात आले. परंतू असा काही कार्यक्रम होणार आहे, याबाबतची माहिती बहुतांश राजकीय पक्ष आणि नागरिकांपर्यंत पोहचवली गेली नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या कार्यक्रमापासून राजकीय कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक वंचित राहिले, असा आरोप भाजपने केला आहे. एवढेच नव्हे तर मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याची माहिती भाजप ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांनी दिलीय. असा मोठा कार्यक्रम होणार असल्याची कोणतीही माहिती नव्हती, या वृत्ताला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिला आहे. तसेच याबाबत कोणतीही माहिती वृत्तपत्र किंवा डिजिटल मिडीयाच्या माध्यमातून मिळाली नाही. वास्तविक बघता या कार्यक्रमाची मोठी प्रसिद्धी करून जास्तीत जनसहभाग करून घ्यायला पाहिजे होता, असेही अॅड. संजय महाजन यांनी म्हटले आहे. शासनाने हर घर तिरंगा अभियान राबवत आहे. तर दुसरीकडे नागरिकांना या कार्यक्रमाची माहिती न देऊन शासनाच्या मूळ धोरणालाच हरताळ फासण्यात आली आहे. हा गंभीर प्रकार असून याबाबत आपण मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे दोषींवर कारवाईची मागणी करणार असल्याचेही अॅड. महाजन यांनी सांगितले.
तिरंगा ध्वजस्तंभाचे काम पूर्ण होईल, याची खात्री नव्हती. परंतू कामपूर्ण झाल्यामुळे तीन दिवस अधिक तिरंगा फडकावता येईल, या भावनेने कार्यक्रम घेतला. १५ आणि १७ ऑगस्ट रोजी संपूर्ण धरणगावच्या नागरिकांसाठी याच ठिकाणी सामुहिक राष्ट्रगीताचा कार्यक्रम घेणार आहोत. तसे निमंत्रण देखील सर्वांना दिले जाणार आहे – जनार्दन पवार (मुख्याधिकारी तथा प्रशासक, धरणगाव)