जळगाव ;- पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कृषी क्षेत्राविषयी व बळीराजाप्रती बांधिलकी म्हणून सुमीरा गांधी परिवार आणि नेहरू चौक बहुद्देशीय मित्र मंडळातर्फे ३१ शेतकऱ्यांना पोळ्याचा साज वाटप करण्यात आला.
हा अनोखा उपक्रम गेली ७ वर्षे नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळ व सुमिरा परिवार यांच्यातर्फे करण्यात येत आहे. उन्हातान्हाची पर्वा न करता शेतात राबणाऱ्या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा असून बैलाच्या सजावटीच्या साहित्याने बाजार फुलले आहेत. मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि पिकांवरील रोग तसेच करोना संक्रमण यामुळे त्रस्त झालेले शेतकरी मात्र पोळा सणाकडे पाठ फिरवत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना पोळ्यासाठी खर्च करणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून पोळ्याचे साज देण्यात आले.
यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून शहराचे आ. सुरेश भोळे, चोपडा मतदारसंघाच्या आ. लताताई सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, उद्योजक संजय गांधी, नेहरू चौक मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांच्यासह शेतकरी रवींद्र गणपत पाटील हे उपस्थित होते.