जळगाव शहरातील शिवाजीनगर पुलाच्या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. लवकरच वाहतूकी करता हा रस्ता सुरू केला जाणार आहे. शिवाजीनगर पुलाच्या कामाबाबत आता जिल्हाधिकारी तसेच महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष दिले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी शुक्रवारी पुलाची पाहणी केली. कामगारांना ताबडतोब पुलाचे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे डांबरीकरणाचे कामही आता अंतिम टप्प्यात आलेले असल्याचे सांगण्यात आले. तसेच पुलाच्या कठड्याचे कामही आता पूर्ण होत आहे. पथदिवे लावण्याबाबत आलेल्या निविदा लवकरच उघडून त्याबाबतही आदेश देण्यात येत आहे. त्यामुळे पथदिवे बसविण्याचे कामही सुरू होणार आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी वाहतूक सुरू होण्याअगोदर पुलावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनाच्या सूचनाही दिल्या.पुलावर आता डांबरीकरणाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, तसेच कठड्यांचे कामही पूर्ण होत आहे. पुलावरून दुचाकी वाहनधारकांसाठी वाहतूक सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लवकरच ही वाहतूक सुरू होणार असून त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले