जळगाव प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या भेट घेत असतात. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. रोहित पवार यांनीच या भेटीचे दोन फोटो ट्विटरवरुन पोस्ट केले आहेत. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
रोहित पवार यांनी बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास केलेल्या ट्विटमधून या भेटीची माहिती दिली आहे. रोहित यांनी पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ते शिंदेंसोबत चर्चा करताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना रोहित यांनी, “मतदारसंघासह विविध विषयांवर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची आज मुंबईत भेट घेऊन चर्चा केली.” असं म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वीच रोहित यांनी एकनाथ शिंदे हे मोठे नेते असल्याचं विधान एका विशेष मुलाखतीमध्ये केलं होतं. महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना २९ जून रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना द्यावा लागला. या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या समर्थनाच्या आधारे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.