लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील कंजरवाडा परिसरात एमआयडीसी पोलीसांनी बुधवारी २७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता छापेमारी केली. यात गावठी हातभट्टीचा अड्डा उध्दवस्त करून सुमारे तब्बल ९५ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी नष्ट केला असून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंजरवाडा परिसरात बेकायदेशीरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे काम सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार बुधवारी २७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीसांच्या वेगवेगळ्या पाच पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलीसांनी तब्बल ९५ हजार ५०० रूपये किंमतीची गावठी दारू बनविण्याचे साहित्य व भट्ट्या उध्दवस्त केले आहे. त्याचप्रमाणे याच परिसरात राहणारे १२ हिस्टरी सीटर, रेकॉर्डवरील ७ गुन्हेगार आणि १ हद्दपार आरोपींची तपासणी केली असता मिळून आले नाही. ही कारवाई सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. इम्रान सैय्यद, महिला पोलीस कॉन्स्टेबल निलोफर सैय्यद यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.