मुंबई : वृत्तसंस्था
स्वतःला “दैवी अवतार” म्हणवून घेत शेकडो भाविकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला कथित अशोक खरात सध्या पोलिस कोठडीत असून तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसा त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळल्याचे चित्र समोर येत आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या चौकशीदरम्यान तपास अधिकाऱ्यांवर “तुमच्यावर देवाचा कोप होईल” अशा प्रकारच्या धमक्या देत तो त्यांना भुलवण्याचा आणि मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न करत होता. तसेच काही अधिकाऱ्यांना भविष्य सांगण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा आहे.
मात्र विशेष तपास पथक (SIT) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) यांच्याकडून सुरू असलेल्या सखोल चौकशीमुळे संपूर्ण प्रकरणाचा आवाका वाढत चालला असून, आरोपीकडून मिळणारी माहिती अत्यंत मर्यादित आणि त्रोटक असल्याचे समजते. कोठडीत असताना पूर्वीचा तोरा आता पूर्णपणे उतरल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सततच्या चौकशीमुळे आणि कायदेशीर कारवाईच्या भीतीमुळे अशोक खरात आता अत्यंत शांत झाला आहे. तो तपासादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना कमी शब्दांत उत्तरे देत असून बराच वेळ एकांतात घालवत आहे. त्याच्या मानसिक तणावामुळे जेवण कमी झाल्याचेही समोर आले आहे. पुढील सुनावणीसाठी न्यायालयात प्रत्यक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रक्रिया व्हावी, अशी विनंती त्याने केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
या प्रकरणात अनेक भाविकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा संशय असून, तपास यंत्रणा त्याच्या आर्थिक व्यवहारांची आणि संपर्कांची सखोल चौकशी करत आहेत. लवकरच आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



