जळगाव : प्रतिनिधी
घरी बसून ऑनलाईन रेटिंगचे काम देऊन कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवत जळगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याची तब्बल २ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल शांताराम पाटील (वय ३६, रा. गाढोदा, ता. जळगाव) यांच्याशी सुरज कुमार नाव सांगणाऱ्या व्यक्तीने संपर्क साधला. त्याने घरी बसून ऑनलाईन रेटिंगचे काम करून चांगले कमिशन मिळेल, असे सांगत त्यांना आकर्षित केले. यानंतर आरोपीने Telegram अॅपवर एक लिंक पाठवून त्यावर नोंदणी करण्यास सांगितले. सुरुवातीला १० ते २० हजार रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर अमोल पाटील यांना ७०० ते ८०० रुपये कमिशन देण्यात आले. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला.
यानंतर आरोपींनी टप्प्याटप्प्याने अधिक रक्कम गुंतवण्यास भाग पाडले. गुंतवलेल्या रकमेनुसार त्यांच्या नावावर तयार झालेल्या वॉलेटमध्ये मोठी रक्कम दिसू लागली, मात्र ती काढता येत नव्हती. पाच दिवसांच्या कालावधीत त्यांनी एकूण २ लाख ९२ हजार ३६३ रुपये गुंतवले, तरीही त्यांना रक्कम परत मिळाली नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अमोल पाटील यांनी ११ एप्रिल रोजी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सुरज कुमार व इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक चौधरी करीत आहेत. दरम्यान, अशा प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.



