वरणगाव : प्रतिनिधी
काहूरखेडा शिवारातील मानपूर रोडवरील सोलर प्लांटजवळील तलाव परिसरातून एका संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन गावठी कट्टे, जिवंत काडतुसे व तलवार असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणात शस्त्र पुरवठा करणाऱ्या दुसऱ्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काहूरखेडा तलावाजवळील मंदिर परिसरात एक शिवारातील व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर प्रभारी अधिकारी अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. यावेळी अशोक जगन्नाथ कोळी (६८, मांगलवाडी, ता. रावेर; सध्या काहूरखेडा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. अधिक चौकशी केली असता त्याने घरातून आणखी एक कट्टा, दोन काडतुसे आणि गादीखालून एक धारदार तलवार काढून दिली. ही कारवाई ११ एप्रिल रोजी करण्यात आली. चौकशीत ही शस्त्रे अरुण लक्ष्मण चांगरे (बडवाणी, मध्यप्रदेश) याच्याकडून घेतल्याची कबुली मिळाल्याने पोलिसांनी १२ एप्रिल रोजी त्यालाही ताब्यात घेतले.



