जळगाव : प्रतिनिधी
मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली अशा वेगवेगळ्या राज्यातील पत्ता देऊन महागडे परफ्यूम मागविले, मात्र नंतर बँकेकडे तक्रार करीत पेमेंट रोखून जळगावातील ऑनलाइन व्यवसाय चालकाची ग्राहकाने १ लाख २१ हजार २८२ रुपयांमध्ये फसवणूक केली. हा प्रकार २९ मार्च ते ६ एप्रिल या दरम्यान घडला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रवी कुमार नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदर्शनगरातील रहिवासी विशाल विनोद जवाहराणी (२६) यांचे परफ्यूम्स बाय जनता शॉपी या नावाचा ऑनलाईन व्यवसाय आहे. वेबसाईटवरून ते ऑनलाईन परफ्यूमचा व्यवसाय करतात. २९ मार्च रोजी रवी कुमार नामक व्यक्तीने मेलवरून ११ हजार १४८ रुपये किमतीचे तीन महागडे परफ्यूम ऑर्डर केले व भोपाळ येथील पत्ता दिला. त्यासाठी सदर व्यक्तीने आंतरराष्ट्रीय डेबिट व क्रेडिट कार्डचा वापर करून ‘रेझॉरपे’द्वारे पेमेंट केले. त्यानुसार व्यावसायिकाने परफ्यूम पाठविले व समोरील व्यक्तीने ते ४ एप्रिल रोजी स्वीकारले. त्यानंतर पुन्हा वारंवार अशा प्रकारे वेगवेगळ्या नावाने गुजरात, दिल्ली येथे महागडे परफ्यूम मागविले.
पेमेंट मिळत नसल्याने व्यावसायिकाने ‘रेझॉरपे’कडून माहिती मागविली असता, ऑर्डर करणारा इसम व पेमेंट करणारा यांची माहिती जुळत नसल्याचे समोर आले. यानंतर विशाल जवाहराणी यांनी १० रोजी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रवी कुमारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक सागर शिंपी करीत आहेत.



