जळगाव : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी मिरवणूक मार्गावर वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये शिवाजीनगर उड्डाणपुलावरून टॉवर चौकात येणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तसेच मार्गावरील सात चौकांमध्ये मिरवणुकीदरम्यान बॅरिकेड्स करण्यात येऊन उपरस्ते बंद करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाच्या वतीने आवश्यक त्या विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये मिरवणूक दरम्यान वाहतुकीचा अडथळा होऊ नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यात १४ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजेपासून गोविंदा रिक्षा थांबा, चित्रा चौक, खैरनार ऑप्टीकलनजीक, घाणेकर चौक, साने गुरुजी चौक, १७ मजली इमारतीच्या बाजूला गोलाणी मार्केटकडून येणारा रस्ता, टॉवर चौकात चित्रा चौकाकडे जाणारा रस्ता या ठिकाणी बॅरिकेटस् लावण्यात येऊन उपरस्ते बंद करण्यात येणार आहे. या उपरस्त्यांवर गर्दी वाढल्यास वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. मिरवणूक काळात या मार्गावर कोणीही, कोणतेही वाहन आणू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शिवाजीनगर उड्डाणपुलावरून टॉवर चौकात येणारा रस्ता १४ रोजी संध्याकाळपासून बंद राहणार आहे. शिवाजीनगरकडून येणारी वाहतूक दूध फेडरेशन व अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (११ एप्रिल) उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सागर शिंपी, वाहतूक शाखेचे निरीक्षक पवन देसले व सहकाऱ्यांनी पाहणी केली.



