मुंबई : वृत्तसंस्था
बीड येथील एका व्यक्तीने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जिवाला धोका असल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांनी सुनेत्रा पवार यांनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, “राजकारणात अशा प्रकारचे धोके संभवतात. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी स्वतःची काळजी घेत सावध राहणे आवश्यक आहे.” बीडमधील व्यक्तीने भोंदू अशोक खरात प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडे (SIT) सुनेत्रा पवार यांना राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यापासून धोका असल्याचा दावा केला आहे. मात्र, याबाबतचे सत्य तपासातून समोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाल्याचे विधान केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले की, वारकरी संप्रदाय हा सर्वसमावेशक असून त्यात विविध जातींचे लोक सहभागी असतात. त्यामुळे त्याला जातीय रंग देणे चुकीचे असून हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणावरून केलेल्या वक्तव्यावरही शिरसाट यांनी टीका केली. “एखादा गुन्हेगार कोणत्याही धर्माचा असो, त्याच्या जाती-धर्मावर न जाता त्याला ‘बलात्कारी’ म्हणूनच पाहिले पाहिजे,” असे ते म्हणाले. तसेच अनेक तथाकथित ‘बाबा’ विविध प्रकरणांत तुरुंगात असल्याचे त्यांनी नमूद केले.
अशोक खरात प्रकरण केवळ अत्याचारापुरते मर्यादित नसून त्यात जमीन घोटाळ्यासह इतरही गंभीर बाबींचा समावेश आहे. या प्रकरणात सखोल चौकशी सुरू असून संबंधित सहकाऱ्यांची नावे लवकरच समोर येतील आणि त्यांच्यावर कारवाई होईल, असा विश्वासही शिरसाट यांनी व्यक्त केला.



