अकोला : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील यावलखेड येथे गुरुवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, दोन लहान मुलांचे मातृछत्र हरपले आहे.
यावलखेड येथील गजानन नगर परिसरात राहणाऱ्या वृषाली अनिल निंबोकार (वय 32) यांचा पती अनिल निंबोकार (वय 42) याने चाकूने सपासप वार करत खून केला. वृषाली या गायत्री ऑर्गेनिक प्रॉडक्ट्स कंपनीत काम करत होत्या. मागील दोन वर्षांपासून त्या कुटुंबासह येथे वास्तव्यास होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये नेहमीच कौटुंबिक वाद होत असत. गुरुवारी सकाळी सुमारे 9.15 ते 9.30 च्या दरम्यान अनिल निंबोकार मोठ्या मुलाला मारहाण करत होता. यावेळी मुलाला वाचवण्यासाठी वृषाली मध्ये पडल्या. यामुळे संतप्त झालेल्या अनिलने त्यांच्यावर चाकूने वार करत गंभीर जखमी केले.
घटनेवेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. मात्र, घरातून आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी वृषाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या, तर आरोपीच्या हातात चाकू होता. संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून साडीने बांधून ठेवले व त्याच्याकडील चाकू हिसकावून घेतला. जखमी अवस्थेतील वृषाली यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अनिल निंबोकार याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.



