जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात बालविवाहाची घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्यानंतर, वर्षभर चाललेल्या शोषणातून ही मुलगी गर्भवती राहिली आणि तिने जिल्हा शासकीय रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात गेल्यावर्षी एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आला होता. लग्न झाले तेव्हा आणि त्यानंतरही पीडितेचे वय कायद्याने लग्नासाठी पात्र नव्हते. विवाहानंतर वर्षभराच्या काळात पीडितेच्या संमतीशिवाय तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्यात आले, ज्यातून ती गर्भवती राहिली. पीडितेला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर तिला जळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिने बाळाला जन्म दिला. मात्र, माता अल्पवयीन असल्याचे निदर्शनास येताच या गंभीर प्रकरणाला वाचा फुटली. पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून, पती, सासू व सासरा यांच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अनंत अहिरे हे करत आहेत.



