लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: तीर्थक्षेत्र आळंदीत मागील आठ दिवसात डंपरच्या धडकेने दोन मोठे अपघात घडले आहेत. या दोन्ही अपघातांमध्ये दोन निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला आहे. संबंधितांच्या आत्म्याला मुक्ती मिळणार का? असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हे दोन्ही निष्पाप जीव गेल्याचे समजले आहे.
आळंदीत पहिल्या अपघातात एकोणीस वर्षीय विद्यार्थीचा मृत्यू झाला. तर सोमवारी (दि.२५) दुसऱ्या अपघातात अवघ्या चार वर्षीय चिमुकलीचे जीवन बहरण्याआधीच समाप्त झाले. वास्तविक दोघांचीही कुठलीही चूक नसताना त्यांना हे जग सोडून जावे लागले आहे. निष्पाप जीवांच्या मृत्यूनंतर भावपूर्ण श्रद्धांजली वाहून . आळंदी शहरातील प्रदक्षिणा मार्गावर रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत रस्ते चांगल्या दर्जाचे आहेत. मात्र बांधण्यात आलेल्या रस्त्यावर आवश्यक कुठेही गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने रस्त्यावरून ये – जा करत आहेत.
शहरात सातत्याने नागरिकांची, भाविकांची, वारकऱ्यांची तसेच विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्यामुळे शहरात प्रवेश करतानाच खबरदारी म्हणून वाहनचालकांनी आपल्या वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आळंदीत डंपर चालकांच्या बेजबाबदारपणे वाहन चालविण्याने दोन निष्पापांचा जीव गेला आहे. तर काही दिवसांपूर्वी मोशीत एका विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू झाला. शहरात आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसविण्याची लेखी मागणी माजी नगरसेवक सागर भोसले यांनी केली आहे.