मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रमुख महिला नेत्री आणि मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांची आज सकाळी अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. तातडीने त्यांना मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे.
यामुळे उद्या गुरुवारी होणार्या विधिमंडळ हक्क समितीच्या बैठकीत त्या गैरहजर राहणार आहेत. रुग्णालय प्रशासनाने ही माहिती थेट विधिमंडळ सचिवालयाला पत्राद्वारे पाठविली जाणार आहे.
सुषमा अंधारे या ठाकरे गटाच्या धारदार वक्तृत्वाची आणि विरोधकांवर थेट हल्ला करण्याच्या शैलीसाठी ओळखल्या जातात. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक समता आणि महिलांच्या हक्कांसाठी मोठे काम केले आहे. ग्रामीण आणि शहरी भागात जनजागृती मोहिमा राबवल्या, राष्ट्र सेवा दल व प्रबोधनवादी संस्थांशी संबंध ठेवून सामाजिक आणि प्रबोधनपर कार्य केले.
त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांच्या प्रकृतीसाठी चिंता व्यक्त होत असून, लवकरात लवकर त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली जात आहे. सुषमा अंधारे यांच्या सक्रियतेमुळे ठाकरे गटाच्या महिला नेतृत्वात त्यांचा महत्वाचा ठसा उमटला आहे.



