जळगाव : प्रतिनिधी
समोरून येणाऱ्या कारला ट्रॅक्टरने धडक दिल्यानंतर आपसात चर्चा सुरू असतानाच अचानक विशाल राजेंद्र बावस्कर (३०, रा. आसोदा, ता. जळगाव) या ट्रॅक्टरचालकाने स्वतःला ट्रकसमोर झोकून दिले. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. ५ रोजी रात्री बायपासवर घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे मध्यप्रदेशातील लिंगा, ता. नेपानगर येथील रहिवासी असलेले विशाल बावस्कर हे सध्या आसोदा येथे राहून ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करायचे. रात्री घरी त्यांचा काही वाद झाला व त्यानंतर ते ट्रॅक्टर घेऊन निघाले. पाळधी ते तरसोद बायपासवरून विरुद्ध दिशेने (राँग साईड) जात असताना समोरून येणाऱ्या कार व ट्रॅक्टरची धडक झाली. त्यानंतर कारचालक व ट्रॅक्टरचालक बावस्कर यांच्यात चर्चा सुरू होती.
त्याचवेळी अचानक ट्रॅक्टरचालकाने बाजूने जात असलेल्या ट्रकसमोर स्वतःला झोकून दिले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. घटनेनंतर तालुका पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने पोलिस ठाण्यात नेली असून, याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक विजय पाटील करीत आहेत.



