रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम निमड्या परिसरातील नवीन नवाड पाड्यावर आठ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. लालूबाई शरद पावरा (वय अंदाजे २५) असे मृत महिलेचे नाव असून, त्या ४ एप्रिल रोजी बेपत्ता झाल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या गळा आवळलेल्या अवस्थेतील मृतदेह डोंगरदरीत एका झाडाला साडीने अडकवलेल्या स्थितीत आढळून आला. ही घटना अत्यंत संशयास्पद असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मात्र, तेथे डॉक्टरांची अनुपलब्धता असल्याने शवविच्छेदनासाठी मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवावा लागला. या संपूर्ण प्रक्रियेत सुमारे ५० तासांचा विलंब झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मृत महिलेच्या पश्चात तीन लहान मुले असून त्या चौथ्यांदा गर्भवती होत्या. त्यामुळे या घटनेने अधिकच गंभीर स्वरूप धारण केले आहे. हा प्रकार आत्महत्या आहे की खून, याबाबत अद्याप स्पष्टता नसून विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.



