जळगाव : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचा ४६ वा स्थापना दिन जळगाव शहरात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. जिल्हा महानगरच्या वतीने जी.एम. फाउंडेशन आणि बळीराम पेठ येथील जुने भाजप कार्यालय येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ८.३० वाजता ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर मांढरे यांच्या हस्ते पक्ष ध्वजवंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर दिवंगत कार्यकर्ते तसेच ज्ञात-अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाला देशभक्तीचा सुर लाभला.
या निमित्ताने भाजप महानगरच्या वतीने पक्षाच्या ४६ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, भगवा गमछा आणि तांब्याचा दिवा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या सन्मानितांमध्ये गजानन काका जोशी, मधुकर मांढरे, उदय भालेराव, भगत बालानी, सुनील बढे, कवरलाल संघवी, अरुण बोरवले, उज्वलाताई बेंडाळे, मुकुंद मेटकर, यशवंत पटेल, लीलाधर ठाकरे, सुनील नारखेडे, विशाल त्रिपाठी, रमेश जोगी, गजानन नेवे, अशोक कोष्टी, किशोर नारखेडे, प्रदीप रोटे, पार्वतीबेन पटेल, रजनी महाजन, महाश्वेता माथुरवैश्य, कुसुमताई सोनवणे, मालतीताई पाटील, बाणाबाई शेवाळे, किसन मराठे, भाग्यश्री चौधरी, सुशील हसवाणी, बाळू कासार, पुरुषोत्तम वाणी, मुकुंद कासार, देवानंद बारी, विकास घोडके, संजय भावसार, पुंडलिक सपकाळे, राजेंद्र मराठे, सुभाष सोनवणे, दीप्ती चिरमाडे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नेते सदाशिव आबा पाटील यांनी ‘जनसंघ ते भाजप’ या विषयावर मार्गदर्शन करत पक्षाच्या प्रवासाची माहिती दिली. ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन जोशी यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
यावेळी आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भाजप पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहिला आहे. दोन खासदारांपासून ३०३ खासदारांपर्यंतचा प्रवास हा कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे शक्य झाला आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण करत जनतेचा विश्वास संपादन केला आहे. खासदार स्मिता वाघ यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्षाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
या कार्यक्रमास महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालानी, नितीन लढ्ढा, राजेंद्र सोनवणे, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, महिला अध्यक्षा नितू परदेशी, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रदीप रोपे यांनी केले, तर सहसंयोजक म्हणून सागर पाटील यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.



