Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नांदेड हादरले : शिवसेना पदाधिकाऱ्याची भररस्त्यात तलवारीने हत्या; तीन दिवसांत पाच खून !
    क्राईम

    नांदेड हादरले : शिवसेना पदाधिकाऱ्याची भररस्त्यात तलवारीने हत्या; तीन दिवसांत पाच खून !

    editor deskBy editor deskApril 6, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नांदेड  : वृत्तसंस्था

    शहरात गुन्हेगारीने कळस गाठल्याचे चित्र समोर येत असून, सोमवारी पहाटे सत्ताधारी शिवसेनेच्या युवा सेनेच्या शहराध्यक्षाची भररस्त्यात तलवारीने निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे नांदेड शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, अवघ्या तीन दिवसांत पाच हत्यांच्या घटनांनी पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

    सोनू कल्याणकर (वय ३५) असे मृत पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ते सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. त्यांच्यासोबत त्यांचा पाळीव कुत्राही होता. यावेळी श्रीनगर परिसरातील पंचशील कापड दुकानाजवळील कुमार ड्रेसेससमोर अचानक चारचाकी वाहनातून आलेल्या ६ ते ७ हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला.

    हल्लेखोरांनी लोखंडी रॉड, चाकू आणि तलवारींचा वापर करत कल्याणकर यांच्या मान, पाठ आणि शरीराच्या विविध भागांवर सपासप वार केले. या हल्ल्याची तीव्रता एवढी होती की, ते जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी ते मृत झाल्याची खात्री करून घटनास्थळावरून पळ काढला.

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासासाठी विशेष पथके तयार केली. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पाठलाग करत गोळीबारही केला. झरी गावालगत संशयित पळून जात असताना पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडून त्याला जखमी केले आणि ताब्यात घेतले. सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    दरम्यान, सोनू कल्याणकर यांच्यावर यापूर्वीही गोळीबाराचा प्रयत्न झाला होता, मात्र ते त्यातून बचावले होते. यावेळी मात्र हल्लेखोरांनी त्यांचा जीव घेतल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, नांदेड शहरात गेल्या तीन दिवसांत ही पाचवी हत्या आहे. दोन दिवसांपूर्वी भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्चस्वाच्या वादातून तिहेरी हत्याकांड घडले होते, ज्यात अरिजितसिंह चव्हाण, मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेज यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वजिराबाद परिसरात रज्जुसिंग तबेलेवाले यांची हत्या झाली होती.

    सतत घडणाऱ्या या हत्यांच्या घटनांमुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे धाडस वाढल्याचे स्पष्ट होत आहे. मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि अगदी रुग्णालय परिसरातही हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाक कमी झाल्याची भावना व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू केला असून, लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बारामतीत बिनविरोधची अपेक्षा, पण लढत अटळ; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा

    April 6, 2026

    59 वर्षांची राजकीय परंपरा कायम; शरद पवारांनी घेतली राज्यसभेची शपथ, पवार घराण्याचा ऐतिहासिक क्षण

    April 6, 2026

    गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला; ७० गावांचा पाणीप्रश्न गंभीर, आंदोलनाचा इशारा !

    April 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.