नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या तब्बल ५९ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी संसदीय कारकिर्दीनंतर पुन्हा एकदा राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेत नवा इतिहास रचला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी व्हीलचेअरवर बसून शपथ घेतली, मात्र त्यांच्या या कृतीने पुन्हा एकदा त्यांच्या जिद्दीचा प्रत्यय देशाला आला.
विशेष म्हणजे, शरद पवार यांच्या या निवडीमुळे आता पवार कुटुंबातील तीन पिढ्या एकाच वेळी संसदेत कार्यरत असल्याचे दुर्मिळ आणि ऐतिहासिक चित्र निर्माण झाले आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातही एक वेगळे पर्व सुरू झाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील राज्यसभेची शपथ घेतली. तसेच महाराष्ट्रातून माया ईवाते, रामराव वाडकुटे आणि ज्योती वाघमारे यांनीही सदस्यत्वाची शपथ घेत संसदेतील आपला कार्यकाळ सुरू केला.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा शपथविधी १० एप्रिल रोजी होण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांची पहिल्यांदाच राज्यसभेवर निवड झाली आहे. ते ९ एप्रिल रोजी शपथ घेणार असून, त्यामुळे महाराष्ट्रातील दोन पिढ्यांचे प्रतिनिधित्व अधिक बळकट होणार आहे.
शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत राज्य आणि केंद्रातील चारही सभागृहांचे सदस्यपद भूषवण्याचा दुर्मिळ मान मिळवला आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९६७ साली आमदार म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले, तसेच केंद्रातही महत्त्वाची मंत्रिपदे सांभाळत राष्ट्रीय राजकारणात आपला ठसा उमटवला.
१९९० पर्यंत सलग सहा वेळा बारामतीचे आमदार राहिल्यानंतर त्यांनी १९९१ ते २०१४ या काळात बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून नेतृत्व केले. २०१४ पासून ते राज्यसभेचे सदस्य म्हणून कार्यरत असून, त्यांच्या या नव्या शपथविधीमुळे त्यांचा संसदीय प्रवास २०३२ पर्यंत अखंडपणे सुरू राहणार आहे.
सहा दशकांहून अधिक काळ सक्रिय राजकारणात राहून शरद पवार यांनी सातत्य, नेतृत्व आणि अनुभव यांचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या शपथविधीने भारतीय संसदीय परंपरेत आणखी एक ऐतिहासिक अध्याय जोडला गेला आहे.



