नाशिक : वृत्तसंस्था
अंधश्रद्धा, हवाला रॅकेट आणि जमीन बळकावल्याच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. पोलिस तपासात असे आढळून आले आहे की, खरातने विविध पतसंस्थांमध्ये बँक खाती उघडताना एकाच विशिष्ट तारखेचा वापर केला होता. या बाबीमुळे तपास अधिकच गूढ बनला असून, त्या तारखेचे महत्त्व काय आहे, याचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खरातने अनेक पतसंस्थांमध्ये उघडलेली खाती एकाच दिवशी किंवा त्याच तारखेला उघडण्यात आली असावीत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित पतसंस्थांकडून त्या तारखेशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि व्यवहारांची माहिती मागवण्यात आली आहे. या तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरात तब्बल 132 बँक खात्यांचा नॉमिनी असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. यापैकी सुमारे 100 खाती समता पतसंस्था येथे असून, 32 खाती जगदंबा पतसंस्था येथे आहेत.
या खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. जगदंबा पतसंस्थेतील 32 खात्यांतून सुमारे 2.74 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे, तर समता पतसंस्थेतील 100 खात्यांतून सुमारे 60 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय आहे. या व्यवहारांची सत्यता आणि स्वरूप तपासण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
तपासात असेही समोर आले आहे की, ही खाती जरी वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर उघडण्यात आली असली, तरी त्या खातेदारांचा संबंधित पतसंस्थांशी थेट संबंध नव्हता. अनेक व्यवहारांवर प्रत्यक्ष नियंत्रण अशोक खरातच ठेवत होता, असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
याच प्रकरणात जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश यांनी चौकशीत काही त्रुटी झाल्याची कबुली दिली आहे. खरातच्या प्रभावामुळे काही निर्णय घेतल्याचे त्यांनी मान्य केले असल्याची माहिती मिळते.
सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या आर्थिक व्यवहारांमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. एकाच तारखेला उघडण्यात आलेल्या खात्यांमागील कारण स्पष्ट झाल्यास या प्रकरणातील अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे.



