बारामती | वृत्तसंस्था
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी ही निवडणूक न लढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे चित्र आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अधिकृत घोषणा करताना सांगितले की, दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या भावनेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतरच पक्षामध्ये निवडणूक न लढवण्याबाबत चर्चा सुरू झाली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज शरद पवार आणि शशिकांत शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर ही भूमिका स्पष्ट करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने हा भावनिक निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, या मतदारसंघात भारतीय कॉंग्रेस उमेदवार देण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची लढत पाहायला मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
बारामतीप्रमाणेच राहुरी पोटनिवडणुकीबाबतही आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या संदर्भात प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा झाली असून, अंतिम निर्णयासाठी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांशीही याबाबत सल्लामसलत सुरू असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी शशिकांत शिंदे यांनी सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले. साताऱ्यात पक्षातील कार्यकर्त्यांना फोडण्यासाठी १० कोटी रुपये आणि सभापतीपदाचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कर्णे आणि त्यांच्या पत्नीला अशा प्रकारची ऑफर देण्यात आल्याचा दावा करत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच, खरात प्रकरणातील सीडीआर कोणाकडून आणि का काढण्यात आले, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित करत गृहविभागाच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
बारामतीत शरद पवार गटाने माघार घेतल्यानंतर आता काँग्रेस काय भूमिका घेते, यावर या पोटनिवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे. काँग्रेसने उमेदवार दिल्यास निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे; अन्यथा सुनेत्रा पवार यांची निवड बिनविरोध होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्याच्या राजकारणात या निर्णयाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत घडामोडींना वेग येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.



