नांदेड : वृत्तसंस्था
शहरातील डी-मार्ट परिसरात शुक्रवारी मध्यरात्री दोन टोळ्यांमध्ये झालेल्या रक्तरंजित गँगवॉरमध्ये तिघांचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्यावर सुरू झालेला हा वाद पुढे थेट रुग्णालयात पोहोचल्याने परिस्थिती अधिकच चिघळली आणि शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ई-स्क्वेअर परिसरात घडली. अरिजितसिंग चव्हाण (वय 25) हा ‘धुरंधर-2’ चित्रपट पाहून घरी परतत असताना त्याच्यावर सय्यद आवेज सय्यद खलील, घनश्याम रेड्डी, मोहम्मद अरबाज आणि त्यांच्या साथीदारांनी तलवार व खंजीराने हल्ला केला. या हल्ल्यात अरिजितसिंग चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या हल्ल्यात जखमी झालेल्या सय्यद आवेज, सय्यद खलील आणि अन्य एका व्यक्तीला तत्काळ विष्णुपुरी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, हल्लेखोर रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळताच मृत अरिजितसिंग चव्हाणचा भाऊ संतप्त झाला. त्याने रुग्णालयात जाऊन जखमी अवस्थेत असलेल्या सय्यद आवेज (27) आणि मोहम्मद अरबाज (23) यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील दोन्ही टोळ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. एका टोळीतील अनिल पंजाबी हा सध्या तुरुंगात असून साहिल हा दोन महिन्यांपूर्वीच जामिनावर बाहेर आला आहे. मृत अरिजितसिंग चव्हाण याच्यावरही नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेनंतर भाग्यनगर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



