धरणगाव : प्रतिनिधी
बांभोरी येथील एका कंपनीतील सिक्युरिटी इन्चार्जने सिक्युरिटी गार्ड महिलेवर अत्याचार करून तिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पोलिसांना माहिती दिल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पाळधी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथून जवळच असलेल्या बांभोरी येथील एका कंपनीत जळगाव शहरात वास्तव्यास असलेली एक महिला सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहे. दरम्यान, सप्टेंबर २०२५ मध्ये मुलगी आजारी असल्याने तिच्या देखभालीसाठी या महिलेस २ दिवसांची सुट्टी हवी होती. त्यासाठी ती महिला सिक्युरिटी इन्चार्ज जनार्दन (पूर्ण नाव माहित नाही) यांना सुट्टीचा अर्ज देण्यासाठी गेली असता त्याने तिला तू मला फार आवडते, तू मला खुश कर, मी तुला सुट्टी देतो आणि तिचा पगार कापणार नाही, असे सांगून त्यांच्याशी अंगलगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या महिलेवर अत्याचार करून त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच या प्रकरणाची वाच्यता कोठे केली, तर तुझा कुटुंबाला जीवे ठार मारेल, अशी धमकी दिली होती.
यानंतर त्याने २१ मार्चला कंपनीत नवीन आलेल्या मुलींना माझ्याकडे पाठवून मला खुश कर, असे सांगितले. या कामाला त्या महिलेने नकार दिल्याने त्याने २३ मार्चला एका सहकारी महिलेला हाताशी धरुन मोबाईलवरून त्यांच्याशी भांडण केले. याबाबत जास्तच त्रास होत असल्याने त्या महिलेने कुटुंबीयांशी चर्चा केली. तर कुटुंबीयांनी त्यांना धीर दिला. त्यानंतर पाळधी पोलिसांत त्या महिलेने फिर्याद दिली आहे. याबाबत पाळधी पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील तपास हे.कॉ. प्रवीण तांदळे करत आहेत.



