नाशिक : वृत्तसंस्था
नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे धागेदोरे समोर येत असून, तपास अधिकच वेगाने पुढे सरकत आहे. या प्रकरणातील महत्त्वाची संशयित व्यक्ती असलेली त्याची पत्नी कल्पना खरात सध्या फरार असून, तिचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) युद्धपातळीवर काम करत आहे. दोन दिवस उलटूनही ती सापडली नसल्याने पोलिसांनी तिच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे.
तपासाच्या अनुषंगाने SITने खरात कुटुंबातील सदस्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन याची पुन्हा चौकशी करण्यात आली असून, कल्पना खरातचे दोन भाऊ यांनाही चौकशीसाठी पाचारण करण्यात आले. या चौकशीतून मिळालेल्या माहितीमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
दरम्यान, SITचे पथक स्थानिक पोलिसांच्या मदतीने सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील कल्पना खरातच्या माहेरी पोहोचले. येथे झालेल्या चौकशीत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, कल्पना खरात गेल्या तब्बल १६ वर्षांपासून माहेराशी संपर्कात नाही. लग्नानंतर तिने माहेराशी जवळपास संबंध तोडले होते. इतकेच नव्हे, तर अशोक खरात तिला माहेरी येऊ देत नसल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. तिच्या भावालाही तिला भेटण्याची संधी मिळाली नसल्याचे समोर आले आहे. कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती साधी असून, ते अल्पशेतीवर उदरनिर्वाह करत असल्याची माहितीही पुढे आली आहे.
या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. शिर्डी परिसरात जमीन खरेदी व्यवहारात कल्पना खरातने एका शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या संदर्भात SITने पुन्हा हर्षवर्धन खरातची चौकशी केली. तपासादरम्यान या व्यवहारात कल्पना आणि तिच्या भावांचा आर्थिक संबंध असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून, नातेवाईकांचाही तपासाच्या कक्षेत समावेश करण्यात आला आहे.
याचबरोबर, अशोक खरातशी संबंधित शिवनिका संस्थानच्या तीन संचालकांचीही चौकशी करण्यात आली आहे. इशान्येश्वर मंदिराशी संबंधित या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. SITकडे उपलब्ध प्राथमिक पुराव्यांनुसार, या संचालकांचा खरातच्या आर्थिक व्यवहारांशी थेट संबंध असल्याचे दिसून येत आहे.
महिलांची फसवणूक आणि धार्मिक विधींच्या नावाखाली लाखो रुपये उकळल्याचे आरोप आधीच समोर आले असताना, आता आर्थिक गैरव्यवहारांचे धागेदोरेही उलगडू लागले आहेत. एकूणच, कल्पना खरात फरार असताना तिच्या कुटुंबीयांपासून ते संस्थात्मक व्यवहारांपर्यंत तपासाचा विस्तार होत असून, येत्या काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



