जळगाव : प्रतिनिधी
पूर्वसूचना न देता व विनापरवानगी रस्त्याचे काम सुरु केल्याचा महापालिका स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी जाब विचारल्याने दारुच्या नशेत असलेले ठेकेदाराने शिवीगाळ केली. ही घटना दि.३१ मार्च रोजी रात्री दादावाडी परिसरात घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात १ एप्रिल रोजी ठेकेदाराविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवक, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या वॉर्डातील दादावाडी परिसरात रस्त्याच्या कामाचा ठेका कंत्राटदार यांनी घेतला आहे. याच परिसरात भुयारी गटारी मंजूर झालेल्या असून त्याचे काम अद्याप बाकी आहे. दि. ३१ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास ठेकेदार यांनी परिसरातील नगरसेवकांसह महापालिका प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता कामाला सुरुवात केली. याविषयी स्थायी समितीचे सभापती डॉ. पाटील यांनी ठेकेदाराला जाब विचारला. यातून वाद झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
जाब विचारल्याचा राग आल्यामुळे दारुच्या नशेत असलेल्या ठेकेदार यांनी डॉ. चंद्रशेखर पाटील यांना शिवीगाळ करीत तुम्हाला पाहून घेईल आणि जीवे ठार मारेल अशी धमकी दिली, अशी तक्रार आहे. याप्रकरणी १ एप्रिल रोजी डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यावरून कैलास भोळे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ठेकेदाराकडून स्थायी समिती सभापतींना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर याच वादातून ठेकेदाराने बंदुक काढल्याची चर्चा शहरात रंगली होती. पोलिसांकडून याबाबत चौकशी देखील करण्यात आली. मात्र तसे काही घडले नसल्याचे स्पष्ट झाले.



