नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे समोर येत असतानाच आज न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी त्याची पोलिस कोठडी संपत आल्याने विशेष तपास पथकाने (एसआयटी) कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी देत तपासाला वेगळे वळण दिले आहे.
अशोक खरातविरोधात लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणूक आणि इतर गंभीर गुन्ह्यांच्या तक्रारी सातत्याने वाढत असून या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, काल रात्री उशिरापर्यंत खरातच्या घराबाहेर नाट्यमय घडामोडी घडल्या. शिर्डी येथील जमीन फसवणूक प्रकरणात खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र एसआयटीचे पथक पोहोचण्यापूर्वीच कल्पना खरात फरार झाल्याने पोलिसांसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे.
या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे खरातचा मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले आहे. त्यामुळे तपासाची दिशा अधिकच गंभीर झाली आहे. तपासादरम्यान अशोक खरात अपेक्षित सहकार्य करत नसल्याचा आरोप एसआयटीने केला असून त्याच्याकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी विविध पद्धतींचा अवलंब सुरू केला आहे. फरार असलेल्या पत्नीचा शोध घेण्यासाठीही प्रयत्न वेगाने सुरू आहेत.
सध्या तपास पथकाने सुरुवातीला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित केले असून त्यानंतर आर्थिक व्यवहार आणि फसवणुकीच्या बाबींची टप्प्याटप्प्याने सखोल चौकशी केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर एसआयटीने तपासाचा फास अधिक घट्ट करत संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी पाचारण केले आहे.
खरातचा चार्टर्ड अकाउंटंट, ईशान्येश्वर मंदिराचा पुजारी तसेच एका सराफ व्यावसायिकाची कसून चौकशी करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहार, मंदिरातील हालचाली आणि संभाव्य गैरव्यवहार याबाबत महत्त्वाचे धागेदोरे शोधण्याचा तपास पथकाचा प्रयत्न आहे.
दरम्यान, न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील तपासाची दिशा निश्चित होणार आहे. पोलिसांनी गोळा केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांवरून प्रकरण अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुटुंबातील सदस्यांवर होत असलेली कारवाई, वाढत्या तक्रारी आणि न्यायालयीन कोठडी या सर्व घडामोडींमुळे अशोक खरातच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.



