मुंबई | वृत्तसंस्था
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पक्ष ताब्यात घेण्याचे काही नेते प्रयत्न करत असल्याचा आरोप केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी जोरदार पलटवार करत गंभीर आरोप केले आहेत.
सूरज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दावा केला की, रोहित पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी आणि पक्षातील नेत्यांची बदनामी करण्यासाठी एका एजन्सीला तब्बल ५ कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. या माध्यमातून पक्षात गोंधळ निर्माण करण्याचा आणि वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
चव्हाण पुढे म्हणाले की, रोहित पवार यांच्या गटाकडून कार्यकर्त्यांची नेमणूक करून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खोटे आरोप करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या पक्षाचे काही पदाधिकारी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. “पक्षात कशी फूट पडेल, भांडणे कशी निर्माण होतील यासाठी सातत्याने नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत,” असा आरोपही त्यांनी केला.
पक्षाच्या संविधानासंदर्भातही दिशाभूल केल्याचा आरोप करत चव्हाण म्हणाले की, एका प्रवक्त्याने सेवा दल आणि ओबीसी सेलला फ्रंटलमधून वगळल्याची चुकीची माहिती माध्यमांना दिली. “हे दोन्ही घटक कधीही फ्रंटल संघटनांमध्ये नव्हते, ते सुरुवातीपासूनच ‘सेल’ म्हणून कार्यरत होते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार यांच्या टीमवर निशाणा साधताना चव्हाण म्हणाले, “आमच्या पक्षाला अडचणीत आणण्याचा आणि बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. मात्र, आमच्या पक्षात शिस्त लावण्यासाठी सुनेत्रा पवार सक्षम आहेत. आमच्या पक्षात लुडबूड करू नका. यापुढे जर टीका केली, तर जशास तसं उत्तर दिलं जाईल,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी मोहोळमधील एका आमदाराच्या कार्यक्रमाचा उल्लेख करत, “ते कोणत्या पक्षाचा बॅनर वापरतात, हे आधी पाहा,” असा टोला लगावला.
दरम्यान, ‘खरात प्रकरणा’बाबत बोलताना चव्हाण यांनी ते गंभीर असल्याचे सांगितले. “या प्रकरणाचा तपास सुरू असून तो योग्य दिशेने चालला आहे. त्यावर अधिक भाष्य करणे उचित नाही,” असे त्यांनी नमूद केले. तसेच, रूपाली चाकणकर यांना समन्स आल्यास त्या चौकशीला सामोऱ्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकूणच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील या आरोप-प्रत्यारोपांमुळे पक्षातील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा उघडकीस आला असून, येत्या काळात या वादाचा राजकीय परिणाम काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



