मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
वडेट्टीवार म्हणाले की, इंधनाच्या तुटवड्यामुळे हायवेवरील अनेक हॉटेल्स बंद पडली असून शहरांमध्येही व्यवसाय ठप्प झाला आहे. काँग्रेस कार्यालयाबाहेरील हॉटेल्सही ओस पडल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, या गंभीर परिस्थितीतही सत्ताधारी केवळ “बनवाबनवी” करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या वेळी त्यांनी भाजपवर उपरोधिक टीका करत म्हटले की, “सध्याची इंधन टंचाईही कदाचित जवाहरलाल नेहरू किंवा इंदिरा गांधी यांच्यामुळेच झाली असेल,” असा टोला लगावला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना या परिस्थितीसाठी जबाबदार धरण्याचा भाजपचा प्रयत्न हा हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.
इराण-अमेरिका-इस्त्रायल संघर्षामुळे भारताच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून देशभरात तुटवडा जाणवत आहे. अनेक शहरांमध्ये गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी सरकारला थेट प्रश्न विचारत जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये आणि तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.
याशिवाय, सातारा जिल्ह्यातील एका घटनेवरही त्यांनी भाष्य केले. मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचा उल्लेख करत त्यांनी राज्याच्या गृहखात्यावर गंभीर आरोप केले. घटनेच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे सांगत हा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
“राज्य सुरक्षित आहे का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. सीसीटीव्ही बंद पडणे, पुरावे नष्ट होणे आणि संपूर्ण घटनेतील संशयास्पद बाबी याकडे त्यांनी लक्ष वेधले.
एकूणच, इंधन टंचाई आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.



