नाशिक : वृत्तसंस्था
राज्यात एलपीजी सिलिंडर आणि इंधन तुटवड्याच्या अफवा वेगाने पसरत असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. राज्यात कोणत्याही प्रकारचा गॅस किंवा इंधन तुटवडा नसून भारत सरकारकडे पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक साठेबाजी टाळावी, असे आवाहनही त्यांनी केले.
भुजबळ यांनी सांगितले की, काही शहरांमध्ये पीएनजी सुविधा उपलब्ध असूनही नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ज्या भागात पीएनजी लाईन पूर्णपणे कार्यान्वित झाली आहे, त्या ठिकाणी नागरिकांनी तीन महिन्यांच्या आत अर्ज न केल्यास एलपीजी सिलिंडर सेवा बंद केली जाऊ शकते. मात्र, हा नियम संपूर्ण राज्यासाठी लागू नसून केवळ पीएनजी सुविधा असलेल्या शहरी भागांपुरताच मर्यादित असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असला, तरी भारतात परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी नमूद केले. रशिया आणि व्हेनेझुएला यांसारख्या देशांकडून इंधन पुरवठा सुरू असून भारतीय जहाजांची ये-जा नियमित सुरू असल्याने नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, व्यावसायिक वापरासाठी गॅस पुरवठ्यात मोठी वाढ करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. एलपीजी साठाही वाढवण्यात आला असून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, ज्या नागरिकांनी पीएनजीसाठी अर्ज केला आहे पण अद्याप लाईन पोहोचलेली नाही, त्यांना एलपीजी सेवा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात गॅस टंचाईबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे परिस्थितीबाबत स्पष्टता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



