मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडामोडींना वेग आला असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील नेतृत्वावरून नवीन वाद निर्माण होताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाचे पुढील सूत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हाती जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप करत, “पक्षावर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर इंदापूर येथे पार पडलेल्या पक्षाच्या कार्यक्रमातील बॅनरमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे 27 मार्च रोजी नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कारासाठी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या बॅनरवर सुनील तटकरे यांचा सर्वात मोठा फोटो झळकला, तर अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनाही स्थान देण्यात आले. मात्र, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार तसेच अजित पवार यांचे फोटो बॅनरवरून गायब असल्याचे लक्षात आले.
यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते विकास लवांडे यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे आता उघड होत आहेत. पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमात त्यांच्या नावालाही स्थान नाही, ही कृतघ्नता आहे.”
लवांडे यांनी पुढे सुनील तटकरे यांच्यावर थेट हल्ला चढवत म्हटले की, “अजितदादांनी अनेक वर्षे प्रदेशाध्यक्ष पदावर ठेवून त्यांना राज्यभर ओळख मिळवून दिली. मात्र आता त्याच नेत्यांकडून पक्षात ओबीसी- मराठा असा जातीयवाद वाढवला जात आहे, जे अजितदादांना मान्य नव्हते.”
तसेच त्यांनी आव्हान देत म्हटले की, “जर हिम्मत असेल तर सुनील तटकरे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत स्वतंत्र पक्ष स्थापन करावा. अन्यथा भाजपमध्ये जाण्याचा विचार असेल तर तोही स्पष्ट करावा.”
या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत मतभेद वाढत असल्याचे चित्र दिसत असून, आगामी काळात या वादाचे राजकीय परिणाम काय होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



