चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील शिवापुर तांडा येथे पती-पत्नीचा गळफास घेतलेल्या – अवस्थेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भगवान पोपट जाधव (वय ३८) व त्यांची पत्नी आशाबाई भगवान जाधव (वय २७, दोघेही रा. शिवापुर तांडा, ता. चाळीसगाव) यांना मृत अवस्थेत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना २८ मार्च रोजी सकाळी ९.४५ वाजण्यापूर्वी घडल्याचे समोर आले आहे. दोघांचाही मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाल्याची प्राथमिक माहिती असून, याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संबंधित प्रकरणे अनुक्रमे अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक १९/२०२६ व २०/२०२६ (बीएनएसएस कलम १९४) अंतर्गत नोंदविण्यात आली आहेत. याघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा व प्राथमिक कार्यवाही करून अहवाल न्यायालयाकडे पाठविला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार प्रविण सपकाळे यांच्या मार्फत सुरू असून, या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील दोघांचा एकाच वेळी झालेला मृत्यू संशयास्पद मानला जात असून, पोलिसांकडून सर्व अंगांनी पोलीस हवालदार प्रविण संगिले व हवालदार अकरम बेग तपास करत आहे.



