नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाणार असल्याच्या अफवा जोर धरत असतानाच केंद्र सरकारने शुक्रवारी याबाबत स्पष्ट भूमिका मांडत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार सरकारच्या स्तरावर सुरू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्र सरकारमधील तीन वरिष्ठ मंत्री — निर्मला सीतारामन, किरण रिजिजू आणि हरदीप सिंग पुरी — यांनी स्वतंत्र निवेदने जारी करून या अफवा निराधार असल्याचे ठामपणे सांगितले.
संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी या अफवांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, “या अफवा नेमक्या कोण पसरवत आहे, हेच समजत नाही. पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, घाबरण्याची अजिबात गरज नाही. देशातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, साठेबाजी करणाऱ्यांना कडक इशारे देण्यात आले असून राज्य सरकारांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत लॉकडाऊनबाबतच्या चर्चांना पूर्णतः फेटाळून लावले. “सरकारी पातळीवर अशा कोणत्याही प्रस्तावाचा विचार सुरू नाही. अशा कठीण काळात नागरिकांनी जबाबदारीने वागणे आणि अफवांना बळी न पडणे गरजेचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.
चार दिवसांपूर्वी संसदेत नरेंद्र मोदी यांनी जागतिक परिस्थितीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर या अफवांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम दीर्घकाळ जाणवू शकतो, असे त्यांनी नमूद केले होते. मात्र, त्याचवेळी देशाने यापूर्वीही COVID-19 सारख्या मोठ्या संकटांचा एकजुटीने सामना केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी सर्वोच्च स्तरापासून तळागाळापर्यंत यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
याशिवाय, आज संध्याकाळी पंतप्रधान सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असून, जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुढील रणनीतीबाबत चर्चा होणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबराट निर्माण करू नये आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. देशात पुरेसा साठा उपलब्ध असून आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.



