जळगाव : प्रतिनिधी
प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त जळगाव शहरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शहरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत विविध पौराणिक पात्रांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या कलाकारांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
या शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले ते ‘महाबली मारुती’च्या वेशभूषेत सहभागी झालेल्या एका तरुणाचे. प्रभावी व्यक्तिमत्त्व, आकर्षक पोशाख आणि साजेशी अंगभाषा यामुळे हा तरुण मिरवणुकीत सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. त्याला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणाईमध्ये अक्षरशः चढाओढ लागल्याचे चित्र दिसून आले. यावेळी शोभायात्रेत आ.राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे यांच्यासह नगरसेवक – नगरसेविका व राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
शोभायात्रेत प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, हनुमान यांसह अनेक पौराणिक दृश्यांचे देखावे सादर करण्यात आले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मोठ्या संख्येने भाविकांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला. नागरिकांनीही रस्त्याच्या कडेला उभे राहून मिरवणुकीचे दर्शन घेतले. काही ठिकाणी भक्तांसाठी पाणी व प्रसादाचेही वाटप करण्यात आले. या भक्तिमय वातावरणात ‘महाबली मारुती’ ठरला खरा आकर्षणबिंदू, ज्यामुळे शोभायात्रेला वेगळेच रंगतदार रूप प्राप्त झाले.



