जळगाव : प्रतिनिधी
वर्षापुर्वी केलेली केस मागे घेण्याच्या कारणावरुन नितीन नाना काळे (वय ३५, रा. जैनाबाद) या तरुणाचा संशयित श्याम तुकाराम सूर्यवंशी (रा. दिनकर नगर) चॉपरने भोसकून निघुण खून केला होता. संशयित सुर्यवंशी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो परिसरात दहशत माजवित होता. त्याची दहशत कमी करण्यासाठी शनिपेठ पोलिसांनी जैनाबाद आणि दिनकर नगर परिसरातून त्याची धिंड काढली. पोलिसांच्या कारवाईचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. संशयितावर हद्दपारीची कारवाई झाली असती तर निष्पाप तरुणाचा जीव वाचला असता.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवा येथे कामाला असलेला नितीन काळे हा मित्राचा साखरपुडा आणि न्यायालयात तारीख असल्याने जळगावात आला होता. दि. २२ मार्च रोजी दुपारी नितीन घरी असतांना संशयित शाम सुर्यवंशी हा त्याला दुचाकीवर बसवून घेवून गेला. त्यानंतर पोलिसात दाखल केलेली केस मागे घेण्याच्या कारणावरुन त्याने नितीनसोबत वाद घातला. परंतू नितीन याने केस मागे घेण्यास नकार दिल्यामुळे संशयित श्याम सुर्यवंशी याने नितीनवर धारदार चॉपरने पोटात वार करुन त्याला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, नितीनवर उपचार सुरु असतांना त्याचा दुसऱ्या दिवशी सकाळी मृत्यू झाला होता.
संशयित श्याम सुर्यवंशी याच्याविरुद्ध सहा गंभीर गुन्हे दाखल असून तो सद्या पोलिस कोठडीत आहे. परिसरात त्याची दहशत असल्याने त्याची दहशत मोडीस काढण्यासाठी पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक शंकर खेडकर, पोहेकॉ प्रदीप नन्नवरे, भागवत शिंदे, योगेश जाधव, अमोल वंजारी, गणेश ढाकणे, युवराज कोळी, पराग दुसाने यांच्यासह होमगार्ड यांच्या बंदोबस्तात कर्मचाऱ्यांनी बुधवार दि. २५ रोजी सुर्यवंशी याची जैनाबाद परिसरातून धिंड काढली.
संशयित शाम सूर्यवंशी याच्यावर शनिपेठ पोलिस ठाण्यात सन २०१४, २०२०, २०२३, २०२५ या वर्षात शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे शनिपेठ पोलिसांनी दि. १४ मे २०२५ रोजी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता. परंतु तो प्रस्तावावर प्रांत कार्यालयाकडून सुर्यवंशी याच्यावर दाखल गुन्ह्यांमध्ये गंभीरता नसल्यामुळे त्याला हद्दपार करता येणार नाही. असा शेरा मारत त्याचा प्रस्ताव दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी रद्द केला. त्यावेळी सुर्यवंशी याच्यावर हद्दपारीची कारवाई झाली असती तर आता त्या निष्पाप तरुणाला जीव गमवावा लागला नसता.



