मुंबई : वृत्तसंस्था
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक वळण आले असून, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “अशोक खरातने जयंत पाटील यांना रक्ताने आंघोळ घातली होती,” असा खळबळजनक दावा पडळकर यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना पडळकर म्हणाले की, जयंत पाटील हे आपल्या मुलासह अशोक खरातच्या इशानेश्वर मंदिरात गेले होते. “त्यांना कोणाच्या रक्ताने आंघोळ घालण्यात आली, हे समोर आले पाहिजे. पोलिसांना नरबळीचा संशय आहे. त्यामुळे त्या रक्ताचे सत्य उघड झाले पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या विचारसरणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “स्वतःला पुरोगामी म्हणवणारे जयंत पाटील देवधर्म मानत नाहीत, मग ते अशा भोंदूबाबाकडे कशासाठी गेले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच, “महिला अत्याचाराबाबत जयंत पाटील यांची भूमिका काय आहे, याचीही चौकशी झाली पाहिजे. अशोक खरात हा गर्भवती महिलांवर अत्याचार करणारा असल्याचे आरोप आहेत, आणि तो जयंत पाटील यांच्याकडे पूजा घालतो, हे स्थानिकांना माहिती आहे,” असा दावा त्यांनी केला.
पुढे आरोप करताना पडळकर म्हणाले की, खरातच्या गावात 40 किलोमीटरची पाणी पाइपलाईन देण्यात जयंत पाटील यांचा सहभाग होता. “जयंत पाटील यांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे,” असेही त्यांनी ठणकावले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अशोक खरातसोबतचा फोटो समोर आल्याबाबत विचारले असता, पडळकर म्हणाले की तो सार्वजनिक कार्यक्रमातील फोटो असून त्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करत, “एकीकडे फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची भाषा करायची आणि दुसरीकडे भोंदूबाबांना घरी बोलावून पूजा करायची, असे दुटप्पी धोरण सुरू आहे,” असा आरोप केला.
वादग्रस्त विधान करताना पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर वैयक्तिक टीकाही केली. त्यांनी म्हटले की, “खरातची कृपा मिळवण्यासाठी त्यांनी अघोरी प्रकार केले असतील,” अशीही टीका त्यांनी केली.
या आरोपांमुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, अशोक खरात प्रकरणातील तपासाच्या पार्श्वभूमीवर या दाव्यांची सत्यता तपासली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



