जळगाव : प्रतिनिधी
जळगाव-भुसावळ महामार्गावरील साकेगाव येथील गोदावरी हॉस्पिटल येथे करण्यात आलेल्या मणक्याच्या शस्त्रक्रियेत कथित हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंगळवारी कुटुंबीयांनी नशिराबाद पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे.
मृत तरुणाचे नाव स्वप्नील रोहिदास बनसोडे असे आहे. त्याच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, स्वप्नीलला फेब्रुवारी महिन्यात कमरेच्या वेदनांचा त्रास होत असल्याने त्याने गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. तपासणीनंतर डॉक्टरांनी मणक्याची शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगितले आणि ९ फेब्रुवारी रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर स्वप्नीलला घरी पाठवण्यात आले. मात्र काही दिवसांतच शस्त्रक्रियेच्या जागी सूज येऊन पू (पस) साचल्याने त्याची प्रकृती बिघडली. त्याचा भाऊ शुभमने त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.
तक्रारीनुसार, दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी एक्स-रे, एमआरआय किंवा इतर आवश्यक प्राथमिक तपासण्या न करता थेट शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी स्वप्नीलला भेटायला गेलेल्या कुटुंबीयांना त्याच्या अंगावर सूज दिसून आली. डॉक्टरांनी किडनी आणि लिव्हरवर सूज आल्याचे सांगितले.
यावेळी कुटुंबीयांनी स्वप्नीलला अन्यत्र हलवण्याची तयारी दर्शवून त्याच्या वैद्यकीय अहवालांची मागणी केली. मात्र रुग्णालय प्रशासनाने नियमांमुळे कागदपत्रे देण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर स्वप्नीलला दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवण्यात आले आणि कुटुंबीयांना प्रवेश नाकारण्यात आला.
काही वेळाने त्याला सीपीआर देण्यात आल्याचे सांगण्यात आले. डॉ. पंडित नावाचे डॉक्टर तेथे आले आणि स्वप्नीलला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगितले. मात्र नंतर कुटुंबीयांना त्याचा मृत्यू झाल्याचे कळवण्यात आले.
कुटुंबीयांनी हा मृत्यू रुग्णालय आणि संबंधित डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, व्हिसेरा तपासणी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवावी आणि शवविच्छेदन ‘इन कॅमेरा’ पद्धतीने करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या गंभीर आरोपांबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी २५ तारखेला आपली अधिकृत भूमिका मांडणार असल्याचे सांगितले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वैद्यकीय सेवेतील निष्काळजीपणाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



