जळगाव : प्रतिनिधी
इन्सटाग्रामवर झालेल्या मैत्रीचा फायदा घेत तरुणीला हॉटेलमध्ये घेवून जात तिच्यासोबत शारिरीक संबंधाची मागणी करीत तिचा विनयभंग केला. तसेच सोबत काढलेले फोटो वेगवेगळ्या आयडीवरुन तरुणीला पाठवून तिची बदनामी केली. ही घटना दि. १० सप्टेंबर ते दि. १० मार्च दरम्यान घडली. याप्रकरणी संशयित रोहीत आनंदा राठोड (रा. उजनी, ता. औसा, जि. लातूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एका गावातील २२ वर्षीय तरुणी शिक्षण घेत असून इनस्टाग्रावरुन तीची ओळख संशयित रोहीत राठोड याच्यासोबत झाली. मैत्रीचा फायदा घेत संशयिताने मुलीला दि. १० सप्टेंबर २०२४ रोजी भुसावळ रस्त्यावर असलेल्या हॉटेल प्रिन्स येथे नेले. तेथे तरुणीकडे त्याने शरिरसुखाची मागणी केली असता तीने नकार दिला. त्यानंतर संशयितानी पिडीतेसोबत अश्लिल कृत्य करीत तिचा विनयभंग केला. तसेच सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत संशयित हा तरुणीला त्रास देवू लागला.
संशयित हा वारंवार त्रास देवूनही तरुणी घाबरत नव्हती. त्यामुळे संशयिताने वेगवेगळ्या इनस्टाग्राम आयडीवरुन तरुणीसोबतचे फोटो व्हायरल करीत तिची बदनामी केली. हा त्रास असह्य झाल्यामुळे तरुणीने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित रोहीत आनंदा राठोड (रा. उजनी, ता. औसा, जि. लातूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सफौ संजय मारवड हे करीत आहे.



