मुंबई : वृत्तसंस्था
सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभा राहिलेला वाद आता राज्याच्या राजकारणातही उग्र रूप घेताना दिसत आहे. सत्ताधारी शिवसेना आणि मित्रपक्ष भाजप यांच्यातील मतभेद सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रियेतून उफाळून आले. भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच आपली सत्ता प्रस्थापित केली, मात्र या प्रक्रियेत मंत्री शंभूराज देसाई यांना भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाली, ज्यामुळे त्यांना जखम झाली.
यामुळे सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री आणि आमदार आज विधिमंडळात आक्रमक झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपली तक्रार मांडून भाजपकडून सुरु असलेली “गळचेपी” आणि दुय्यम वागणूक सहन न करता, अन्यथा राजीनामे देण्याचा इशारा दिला.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणावर आक्रमक प्रतिक्रिया देत “सातारा जिल्हा परिषदेतील मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार हा लोकशाहीचा खून आहे,” असे विधान केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
शंभूराज देसाई यांनी सांगितले, “गेल्या 40 वर्षांत राजकारणात कधीच पोलिसांकडून लोकप्रतिनिधींवर हातपाय झाला नाही. मात्र साताऱ्यात भाजपकडून आमच्या सदस्यांना रोखण्यात आले. मतदानासाठी गेलेल्या आमच्या 33 सदस्यांना पोलिसांनी अडवले. अनेक प्रकारे धक्काबुक्की झाली आणि मला जखम झाली.” सत्ताधारी पक्षांमधील हा संघर्ष राज्याच्या राजकारणात पुढे कसा वळण घेतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.



