मुंबई : वृत्तसंस्था
काँग्रेसचे विधानसभेतील नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व मंत्र्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी या प्रकरणातील मंत्र्यांना सहआरोपी करण्याचीही मागणी केली आणि त्यांच्या राजीनाम्यांचा आग्रह धरला.
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली आहे. पोलिसांनी खरातला अटक केली आहे, तसेच त्याच्या ट्रस्टवरील सदस्य रुपाली चाकणकर यांनाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु या प्रकरणात काही उच्चपदस्थ नेत्यांचा हात असल्यामुळे राजकारण तापले आहे.
वडेट्टीवार म्हणाले, “पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला भोंदूगिरीचा बाजार आणि त्याला मिळणारे राजकीय व प्रशासकीय संरक्षण अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. अशोक खरातने धर्माच्या नावाखाली केलेला हैदोस आणि त्याला साथ देणारे अधिकारी व मंत्री यांना या प्रकरणात सहआरोपी करून कारवाई केली पाहिजे.”
ते पुढे म्हणाले, “खरातचे १०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले आहेत. स्वतःला देवाचा अवतार सांगून आणि ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणाऱ्या अशोक खरातमुळे महिलांचे लैंगिक शोषण झाले. हे प्रकरण फक्त भोंदू बाबापुरते मर्यादित नाही, तर त्याला आश्रय देणारे IAS, IPS आणि महसूल विभागाचे अधिकारी देखील सामील आहेत. काही मंत्र्यांनी आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी एका हॉटेलमध्ये बैठक घेऊन कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला, ही माहिती अत्यंत धक्कादायक आहे.”
वडेट्टीवार यांनी यावर ठाम भूमिका घेत सांगितले, “केवळ SIT नेमून हे प्रकरण शांत होणार नाही. संबंधित मंत्र्यांचा राजीनामा, अधिकाऱ्यांचे निलंबन तसेच सर्व आरोपी आणि संशयित अधिकाऱ्यांचे CDR तपासणे आवश्यक आहे. ज्या लोकांनी भोंदू बाबाला प्रतिष्ठा मिळवून दिली, त्यांना सहआरोपी केले पाहिजे.” या स्थगन प्रस्तावाने विधानसभेत मोठी चर्चा उभे राहिली असून, राज्यातील राजकीय आणि प्रशासनिक क्षेत्रात या प्रकरणाची संवेदनशीलता अधोरेखित केली आहे.



