आंबेडकर स्मारक ते मरीमाता मंदिर मार्ग होणार सुकर; विद्यार्थ्यांसह भाविकांना दिलासा
धरणगाव : प्रतीनीधी
धरणगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून मरीमाता मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून लवकरच हे काम पूर्णत्वास येणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी आता पूर्ण होत असल्याने मोरया परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या रस्त्याच्या अभावामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर चिखल आणि पाण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः बालकवी ठोंबरे शाळा, रेल्वे स्टेशन, स्वामी समर्थ केंद्र आणि चिंतामण मोरया मंदिराकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता काँक्रीट रस्ता झाल्यामुळे या सर्व समस्यांपासून नागरिकांची सुटका होणार आहे.
तसेच, धरणगावातील दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे निर्माण होणाऱ्या गर्दीत एसटी महामंडळाच्या बसना मार्ग काढताना अडथळे येत होते. नवीन रस्त्यामुळे वाहतुकीचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणारे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील तसेच रस्त्याच्या कामात विशेष लक्ष घालणारे युवा नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे परिसरातील नागरिकांनी आभार मानले आहेत.
एकूणच, या रस्त्याच्या कामामुळे धरणगाव शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल होणार असून दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी अखेर मार्गी लागल्याची भावना व्यक्त होत आहे.



