जळगाव : प्रतिनिधी
मतदार यादी दुरुस्तीविषयी दिलेले काम करण्याबाबत दिरंगाई केल्याने सात बीएलओंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विषयी वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने महाराष्ट्रात लवकरच मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू होणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून सन २०२४च्या मतदार यादीतील मतदार शोधून बीएलओ अॅपमध्ये मॅपिंग करणे, अस्पष्ट फोटो दुरुस्ती करणे, एकसारख्या नोंदी शोधणे (डीसीई) असे काम सुरू आहे. यासाठी जळगाव शहरात ३५८ बीएलओंची नेमणूक करण्यात आली. यापैकी सात बीएलओंनी नोटीस देऊनही काम सुरू केले नाही तर कोणी अत्यल्प काम केल्याचे आढळून आले. या सर्व बीएलओंना १९ सप्टेंबर २०२५, ४ ऑक्टोबर २०२५, ३१ डिसेंबर २०२५, १६ फेब्रुवारीच्या निवडणूक संदर्भातील बैठकीमध्ये सूचना देण्यात आल्या. तसेच ग्रुपवर मेसेज टाकूनसुद्धा त्यांनी काम केले नाही. त्यामुळे तहसीलदार शीतल राजपूत यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ५ मार्च, १७ मार्च रोजी बैठक घेऊन जे बीएलओ हे काम करणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
निवडणूक नायब तहसीलदार नवीनचंद्र भावसार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून महानगरपालिकेचे लिपीक विकास सावळे, संजय रामदास सपकाळे, अलहिला स्कूलचे शिक्षक तौसिफ शेख गणी, महिला बालविकास विभागातील अंगणवाडी सेविका विमल सुपडू भारसके, रावसाहेब राऊत विद्यालयाचे शिक्षक रवींद्र अशोक कोळी, मिल्लत स्कूचे शिक्षक आरीफ खान इस्माईल खान, बालविश्व विद्यालयाचे शिक्षक राहुल सुरेश धनगर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.



