भुसावळ : प्रतिनिधी
गुढीपाडव्याच्या उत्साहात रंगलेल्या गोजोरा गावात श्री मरी मातेच्या यात्रेदरम्यान पारंपरिक ‘बारा गाड्या’ सोहळ्यात दुर्दैवी अपघात घडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. उत्सवी वातावरणात घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ गुरुवार रोजी सायंकाळच्या सुमारास चोरवड-गोजोरा मार्गावर यात्रेनिमित्त ‘बारा – गाड्या’ या पारंपरिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला गोजोरा तसेच परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात सोहळा सुरू असताना अचानक ही दुर्दैवी घटना घडली. अशोक बाबुराव कोळी (वय ५७, रा. गोजोरा) हे सोहळा पाहत असताना गर्दीतून पुढे आले असावेत, अशी प्राथमिक माहिती आहे. ते एका हाताने अपंग असल्यामुळे त्यांना हालचाल करण्यात अडचण येत होती. याच दरम्यान चौथ्या व पाचव्या गाडीच्या दरम्यान ते अडकल्याने त्यांच्या अंगावरून गाड्या गेल्या. यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर काही क्षणांसाठी सोहळा थांबवण्यात आला आणि उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत अशोक कोळी यांना बाहेर काढले व तातडीने भुसावळ येथे उपचारासाठी हलवले. तेथे डॉ. राजेश मानवतकर यांच्या दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे गोजोरा गावात शोककळा पसरली असून, यात्रेचा उत्साह एका क्षणात शोकात बदलला. अशोक कोळी हे मनमिळाऊ, शांत स्वभावाचे व सर्वांना मदत करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे गावाने एक जिव्हाळ्याचा माणूस गमावला असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व मुलगी असा परिवार असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती भुसावळ तालुका पोलिसांना देण्यात आली असून, घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे.



