पुणे : वृत्तसंस्था
बारामतीसह राज्यातील दोन विधानसभेच्या पोटनिवडणुकांबाबत महाविकास आघाडीत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत, शरद पवार गटाने निवडणूक लढवली नाही तर संबंधित जागांवर काँग्रेस उमेदवार देण्याचा इशारा दिला आहे.
काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, बारामती पोटनिवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या न लढण्याच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत नाही. या संदर्भात महाविकास आघाडीत अद्याप अधिकृत चर्चा झालेली नसून, परस्पर चर्चेनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, बारामतीतील काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार न दिल्यास काँग्रेस स्वतःचा उमेदवार उभा करेल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. यासोबतच, राष्ट्रवादी काँग्रेसमुळे बारामतीत काँग्रेसला वाढ मिळाली नाही, अशी नाराजी स्थानिक स्तरावर व्यक्त होत आहे. तसेच, राष्ट्रवादीने अनेक वेळा युती करून काँग्रेसला अडचणीत टाकल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून, २३ एप्रिल रोजी मतदान तर ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून सुनेत्रा पवार उमेदवार असतील, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका ठामपणे मांडत, “आम्ही बारामतीची जागा लढवणार नाही. सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नाही,” असे स्पष्ट केले. तसेच, महाविकास आघाडीही या पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे बारामतीतील राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली असून, महाविकास आघाडीत पुढे काय निर्णय होतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



