जळगाव प्रतिनिधी । शहरातील शाहू नगर भागातील जळकी मीलच्या मोकळ्या जागेत चौघे जण दारू पित असतांना बाचाबाची झाली. यात दारूच्या नशेत असतांना तिघांनी रमा उर्फ रहीम शहा मोहम्मद शहा याचा चाकूने सपासप वार करून खून केला. पोलीसांनी काही तासातच तिघांना ताब्यात घेतले आहे.
रहीम शहा उर्फ रमा मोहम्मद शहा (वय-२५) रा. गेंदालील मील, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.
रहीम शहा उर्फ रमा मोहम्मद शहा हा मालधक्क्यावर हमालीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. बुधवारी २० जुलै रोजी कामावर सुटी असल्याने सहकारी पवन किसन लाडे, मनोज जलाल गायकवाड आणि विलास तुकाराम निकम तिघे रा. गेंदालाल मील, जळगाव यांच्यासोबत दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळकी मील परिसरातील मोकळ्या जागेत रेल्वे रूळाजवळ दारू पिण्यासाठी बसले. यात रहिम शहा याचे तिघांशी बाचाबाची झाली. तिघांनी मिळून त्याचा चाकूने भोसकून खून केला आणि पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. खून करणाऱ्या तिघांना बीगबाजार परिसरातून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्या पथकाने अटक केली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.