जळगावः प्रतिनिधी
तालुक्यातील आसोदा येथे एका मजुराला ‘खुन्नस’ का दिली, या कारणावरून ७ते ८ जणांच्या टोळक्याने एकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दि. १५ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली असून, या हल्ल्यात पीडित व्यक्तीसह त्यांचे कुटुंबही जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील असोदा येथे अमजद समद शेख (वय ४२) हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रविवारी दुपारी ३ वाजता, ‘तू मला खुन्नस का दिली?’ असा जाब विचारत काही जणांनी अमजद शेख यांना घेरले आणि बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर भांडण सोडवण्यासाठी अमजद शेख यांची पत्नी आणि भाऊ धावून आले. मात्र, संतापलेल्या संशयित आरोपींनी त्यांनाही सोडून दिले नाही. दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. इतक्यावरच न थांबता, हल्लेखोरांनी अमजद शेख यांच्या मालकीची दुचाकी आणि रिक्षाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करून नुकसान केले. या प्रकरणी अमजद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सलीफ शेख, मुश्ताक शेख, मेहमुद शेख, शेख निमनु, शहबाज शेख, रियान शेख यांच्यावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला आहे. पुढील तपास प्रकाश चिंचोरे हे करत आहेत.



