सर्व गावांना मिळणार फिल्टरचे पाणी; आ. सावकारे व मा. जि.प. सदस्य विश्वनाथ पाटलांचा यशस्वी पाठपुरावा
भुसावळ प्रतिनिधी- राज्याचे तत्कालीन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी तालुक्यातील कुर्हे पानाचे तसेच महादेवमाळ; वराडसीम, जोगलखोरी; गोजोरे आणि मोंढाळे या सहा गावांसाठी जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत तब्बल २३ कोटी रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली असून याला तांत्रीक आणि प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील यांनी याच गावांना २००८ साली पाणी पुरवठा योजना मंजूर करून तेव्हापर्यंत भेडसावणारा पाण्याचा प्रश्न कायम निकाली काढला होता. आता १५ वर्षांनी हीच योजना अधिक अद्ययावत स्वरूपात आणि आगामी ३० वर्षांचा वेध घेऊन नव्याने अंमलात येणार आहे. अर्थात, त्यांच्यामुळे कुर्हे परिसरातील जनतेला आ. गुलाबराव पाटील यांच्याकडून ही मोठी आणि महत्वाची भेट मिळाली आहे. तर यासाठी आमदार संजय सावकारे यांनी केलेले सहकार्य देखील तितकेच महत्वाचे ठरले आहे.
जिल्हा परिषदेचे माजी शिवसेना गटनेते तथा माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य विश्वनाथ पाटील यांनी २००८ साली कुर्हे गावासह सदर तीन गावांसाठी एकत्रीत पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली होती. यामुळे कुर्हे पानाचे, वराडसीम, गोजोरा आदी गावांसाठी वाघूर धरणावरील कंडारी गावाच्या भागात असलेल्या बॅकवॉटर परिसरातून पाण्याचा स्त्रोत वापरून पाणी उचलण्यात आले होते. ही योजना आतापर्यंत सुरू असून यामुळे सदर तिन्ही गावांची पाणी टंचाई कायमची संपुष्टात आलेली आहे. दरम्यान, आता या योजनेला सुमारे १५ वर्षे झाली असून या माध्यमातून योजनेचे नूतनीकरण आवश्यक आहे. यासोबत गावांची वाढीव लोकसंख्या आणि विशेष म्हणजे गढूळ पाण्यावर उपाय म्हणून अद्ययावत फिल्टर प्लांटने युक्त असणार्या पाणी पुरवठा योजनेची नितांत आवश्यकता होती. यानुसार, विश्वनाथ पाटील यांनी तत्कालीन पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्याकडे या संदर्भातील प्रस्ताव सादर करून याचा पाठपुरावा केला. या कामी त्यांना आमदार संजय सावकारे यांचे सहकार्य मिळाले. यामुळे ही योजना प्रत्यक्षात लवकरच सुरू होणार आहे.
कुर्हे तीन गावे प्रादेशीक पाणी पुरवठा योजना ही आगामी ३० वर्षातील अर्थात २०५४ सालची लोकसंख्या गृहीत धरून तयार करण्यात आली आहे. यात दरडोई ५५ लीटर मानकानुसार पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. सदर योजनेचे अंदाजे मूल्य २३ कोटी ४७ लक्ष ६८ हजार रूपये आहे. या योजनेला १० मार्च २०२२ रोजी तांत्रीक मंजुरी तर ११ मे २०२२ रोजी याला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. लवकरच या योजनेचे विधीवत भूमीपूजन करण्यात येणार आहे.
अशी असेल योजना
कुर्हे तीन गावे प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत कुर्हे पानाचे व महादेवमाळ; वराडसीम व जोगलखोरी, गोजोरा आणि मोंढाळा या सहा गावांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. या पाण्याचा मुख्य स्त्रोत ( उदभव ) हा भुसावळ ते जामनेर रस्त्यावरील वाघूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात घेण्यात येणार आहे. या ठिकाणी सहा मीटर व्यासाची जॅकवेल आणि याला ऍप्रोच ब्रीज उभारण्यात येणार आहे. तेथून डीआय पाईपांच्या मदतीने पाणी महादेव पाळ येथील शुध्दीकरण प्रकल्प अर्थात फिल्टरेशन प्लांट येथे आणले जाणार आहे. येथे पाण्यावर प्रक्रिया करून ते शुध्द करण्यात येणार आहे. यानंतर प्रत्येक गावातील जलकुंभाच्या माध्यमातून ते सहाही गावांमधील ग्रामस्थांना त्यांच्या घरापर्यंत पोहचवण्यात येणार आहे.
*सहा ठिकाणी उभारणार जलकुंभ*
सदर पाणी पुरवठा योजनेत पाण्याचा स्त्रोत आणि जलशुध्दीकरण प्रकल्पाच्या सोबतच जलकुंभ देखील महत्वाचे आहेत. फिल्टर प्लांटमधून शुध्द झालेले पाणी हे कुर्हे पानाचे व महादेवमाळ; वराडसीम व जोगलखोरी, गोजोरा आणि मोंढाळा या गावांमधील पाण्यांच्या टाक्यांमध्ये साठविण्यात येणार आहे. यासाठी या गावांमध्ये २.५५ लक्ष; १.५५ लक्ष; ०.३५ लक्ष; ०.५० लक्ष; ०.६५ लक्ष आणि ०.४० लक्ष लीटर क्षमतेच्या सहा पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. तर गावांमधील वाढीव भागात पाईपलाईन चे काम होणार असून जीर्ण जलवाहिन्या ( पाईपलाईन) काढून नवीन पाईपांच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
यांचे लाभले सहकार्य !
माजी जिल्हा परिषद शिवसेना गटनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी कुर्हे तीन गावांच्या प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेची संकल्पना आ. गुलाबराव पाटील यांच्याकडे मांडली. याबाबत आमदार संजय सावकारे यांनी देखील सहकार्य केले. माजी पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ याला मंजुरी प्रदान केली. यासाठी विश्वनाथ पाटील यांना माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान पवार, एम जी पी चे कार्यकारी अभियंता निकम तसेच कुऱ्हे, वराडसीम, गोजोरे व मोंढाळे, परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी आणि सदस्य यांचे सहकार्य लाभले लाभले.
लवकरच योजना मार्गी लागणार : आ. गुलाबराव पाटील
या संदर्भात सदर योजनेचे शिल्पकार असणारे तत्कालीनपाणीपुरवठा विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या योजनेची वर्क ऑर्डर लवकरच दिली जाणार असून पाच गावांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याची ग्वाही दिली आहे. ते म्हणाले की, विश्वनाथ पाटील यांनी आपल्या गावासह परिसरातील जनतेच्या सुविधेसाठी या योजनेचा सातत्याने पाठपुरावा केल्याने याला गती मिळाली आहे. आता निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच याला प्रारंभ होणार असून याबाबत वनविभागाची परवानगीसाठी संबंधीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.