जळगाव : प्रतिनिधी
शहरातील स्टेडीयम लगत असलेल्या पोलीस लाईन समोरील व शहराच्या आमदारांच्या कार्यालयालगतचे फर्निचरचे दुकान चोरट्यांनी मंगळवारच्या रात्रीतून फोडले. चोरट्यांनी २२ हजाराची रोकड, ५ कुलर व स्टीलची सीडी लंपास केली आहे.
याबाबत जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. निळकंठ आनंदा नारखेडे (रा. नंदनवन कॉलनी, ख्वाजामिया दर्गाच्याच्या मागे) यांचे बेंडाळे कॉलेज लगतच्या शॉपिंग सेंटरमध्ये हर्षल एजन्सी नावाने फर्निचरचे दुकान आहे. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे ८ वाजता दुकान बंद करून ते व त्यांचा कर्मचारी घरी गेले.
दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांच्या दुकानात काम करणारा संदीप पाटील (रा. ममुराबाद) हा कामगार घरून चाबी घेवून दुकान उघडण्यासाठी गेला असता त्याला दुकानाचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने फोन करून नारखेडे यांना कळवून दुकानावर बोलावले. रोकडसह साहित्य केले लंपास… चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून काऊंटरमधील २२ हजारांची रोकड, मॅगो कंपनीचे ५ कुलर, अॅल्यूमिनीअमची सीडी असे चोरून नेले. या प्रकरणी नारखेडे यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाल असून पुढील तपास पोलीस नाईक कमलेश पवार हे करीत आहे.



