यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस आमोदा येथील तरुणाने आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह घरी असताना आमोदा येथील तरुणाने ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिला आमिष दाखवून फूस लावली. पालकांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटना लक्षात आल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत. अखेर पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अर्जुन सोनवणे करीत आहेत.



